प्रत्येक पालकांना पडणारा प्रश्न मुलांच्या दहावी आणि बारावी नंतर पुढे काय?
🤔 जर तुम्ही डिग्री आणि डिप्लोमा इंजिनिअरिंग चा विचार करताय तर हा लेख तुमच्यासाठी आहे. हा लेख पूर्ण वाचा कदाचित तुमच्या मुलांचे भवितव्य आणि तुमच्या आयुष्यभराची जमापुंजी कदाचित वाचू शकेल. म्हणून वेळात वेळ काढून हा लेख पूर्ण वाचा आणि आवडला तर तुमच्या परिवारातील इतर दहावी बारावीला असलेल्या मुलांच्या पालकांसोबत नक्कीच शेअर करा.
1. सर्वात आधी आपल्या मुलांचा इंटरेस्ट समजून घ्यावा. खरंच जर त्यांना गाड्या फिरवण्या पेक्षा गाड्यांचा इंजिन मध्ये जास्त इंटरेस्ट असेल तर मेकॅनिकल इंजिनीअरिंग, कंप्यूटर प्रोग्रामिंग वेब डिझाईनिंग डेव्हलपमेंट मध्ये इंटरेस्ट असेल तर कॉम्प्युटर इंजिनिअरिंग, बांधकाम क्षेत्रात जर स्वतःचा ठसा उमटवायचा असेल तर सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इक्विपमेंट मध्ये इंटरेस्ट असेल इलेक्ट्रॉनिक्स इंजीनियरिंग, इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग च्या पर्यांचा विचार करू शकता.
अन्यथा मुलांना आवडेल व ज्यामध्ये भविष्यात मागणी असण्याची शक्यता असेल तो पर्याय त्यांना एखाद्या त्या क्षेत्रातील व्यक्ती बरोबर डिस्कशन करून सल्ला घेऊन निवडू द्यावा. सध्या काय चालते हा विचार सोडून भविष्यात तीन ते चार वर्षानंतर कशाला डिमांड येऊ शकते हा विचार आधी करावा. अजून एक खरंच आपल्या मुलांना हा अभ्यासक्रम झेपेल का त्यांना सेल्फ स्टडी करता येते का हे देखील जाणून घ्या कारण दहावीपर्यंतचे विश्व वेगळे असते परंतु त्यानंतर सेल्फ मोटिवेशन ने सेल्फ स्टडी करण्याची सवय लावून घ्यावी लागते.
2. इंजीनियरिंग ची ब्रांच डिसाईड झाल्यानंतर कॉलेजेस आणि युनिव्हर्सिटी चा विचार प्रथम करावा लागतो. युनिव्हर्सिटी निवडताना तिला प्रथम AICTE, DTE, UGC च्या मान्यता तपासून पहाव्यात. कॉलेज निवडताना NAAC, AICTE, DTE, UGC, University च्या मान्यता तपासून पहाव्यात.
3. ऍडमिशन घेताना लागणारे आवश्यक कागदपत्रे जसे आधीच्या मार्क शीट्स, शाळा किंवा कॉलेज सोडल्याचा दाखला, आधार कार्ड, पॅन कार्ड, डोमासाईल चा दाखला, कास्ट मध्ये असेल तर जातीचा दाखला, नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट आणि जर उत्पन्न कमी असेल तर उत्पन्नाचा दाखला उपलब्ध असावा किंवा कमीत कमी तुम्ही या दाखल्यांसाठी अर्ज केलेल्या चे रिसिप्ट किंवा पोचपावती तुमच्याकडे असावी.
त्या डॉक्युमेंट चे कमीत कमी पाच सेट झेरॉक्स काढून घ्यावेत. त्याच बरोबर अत्यंत महत्त्वाचे की सर्व ओरिजनल डॉक्युमेंट्स यांना स्कॅन करून स्वतः च्या गुगल ड्राईव्ह वरती पर्सनल डॉक्युमेंट्स फोल्डर बनवून अपलोड करून ठेवावेत. लक्षात ठेवा कधीही हा डॉक्युमेंट फोल्डर कुणासोबत ही शेअर करू नका.
4. CAP Round मध्ये कॉलेज निवडताना आपली गुणवत्ता आणि गेल्या वर्षाचे त्या कॉलेजचे कट ऑफ लिस्ट सुद्धा जाणून घ्या. गुणवत्ता खरंच जर चांगली असेल तर आपल्या आजूबाजूला स्थानिक पातळीवर असलेल्या नामांकित “ए” ग्रेड कॉलेजेस चा विचार पहिल्या तीन कॅप राऊंड ॲडमिशन च्या वेळी नक्कीच करू शकता कारण सद्य परिस्थितीमध्ये इंजिनीरिंगची ओढ खूप कमी दिसून येते त्यामुळे दरवर्षी चांगल्या कॉलेजेस च्या सीट्स सुद्धा रिकाम्या राहिलेल्या दिसून येतात.
या परिस्थितीचा फायदा घेऊन तुम्ही चांगल्या नामांकित “A” Grade कॉलेजेस मध्ये नक्कीच एडमिशन साठी प्रयत्न करू शकता. घाबरण्याचे कारण नाही जर पहिल्या तीन राऊंड मध्ये ऍडमिशन नाही झाले तर चौथा काउंसलिंग राऊंड मध्ये तुमच्या मुलांचे नक्कीच ऍडमिशन कमीत कमी “B” ग्रेड कॉलेजेस मध्ये होऊ शकते.
त्यामुळे धैर्य ठेवावा आणि कोणाच्याही बोलण्यात येऊ नये. या चौथ्या कौन्सलिंग राऊंड ची तयारी असेल तर चुकूनही आपल्या मुलांचे ओरीजनल डॉक्युमेंट्स कुठल्याही कॉलेजेसच्या हातात देऊ नये अन्यथा चौथा कौन्सिलिंग राउंड मध्ये हे कॉलेजेस तुमच्या मुलांचे पालक बनून त्या ऍडमिशन सेंटर मध्ये उपस्थित राहतात आणि बळजबरीने चांगल्या संधी नामांकित कॉलेजेस मध्ये उपलब्ध असताना देखील स्वतःच्या कॉलेजेस मध्ये ॲडमिशन करून घेतात. अशा प्रकारांना कुठल्याही पालकांनी बळी पडू नये ही खबरदारी घ्यावी.
5. इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेताना आपले आर्थिक गणित नक्कीच समजून घ्यावे कारण डिग्री असो वा डिप्लोमा सामान्यपणे फीज 60,000 ते 1,20,000 आणि जर होस्टेल फीज पकडले तर वर्षाला पन्नास ते साठ हजार अधिक पडू शकते म्हणजेच वर्षाला कमीत कमी सरासरी दीड लाख याप्रमाणे पुढच्या तीन ते चार वर्षांसाठी कमीत कमी पाच ते सहा लाख खर्च येणार हे पकडून चालावे.
जर घरी आर्थिक परिस्थिती बेताची असेल आणि जर एज्युकेशन लोन घेण्याचा विचार असेल तर नक्कीच थांबा आणि पुन्हा एकदा विचार करा. आपल्या देशात होम लोन कार लोन दहा टक्के व्याजाने मिळते परंतु एज्युकेशन लोन 13 ते 14 टक्के व्याजाने मिळते आणि त्यासाठी ही दोन जामीनदार दाखवावे लागते. लक्षात घ्या तीन ते चार वर्षानंतर जेव्हा डिग्री किंवा डिप्लोमा होईल तोपर्यंत ही मुद्दल दुप्पट झालेली असेल.
सध्या अशाच परिस्थितीत सापडलेले कित्येक बेरोजगार इंजिनियर मानसिक तान तणावाखाली वावरतांना दिसतात कारण घरची आर्थिक परिस्थिती सुधारण्यासाठी लोन घेऊन शिक्षण घेतले परंतु ८ ते 12 हजाराच्या जॉब मध्ये लोनचा हप्ता आणि घरचा खर्च भागवतांना नवीन सुशिक्षित तरुणांचा उमेदीचा काळ या कैचीत सापडून निघून जातो तोपर्यंत नवीन जबाबदारीचे ओझे त्यांची वाटच पाहत असते.
म्हणून जर आर्थिक परिस्थिती बेताची असेल तर मोठ्या खर्चिक कोर्सेस च्या मागे न पळता आपल्या स्किल डेवलपमेंट वर फोकस करणारे आयटीआय किंवा स्किल इंडिया अंतर्गत येणारे कोर्सेस करून लवकरात लवकर व्यवहारी जगात उतरावे चार ते पाच वर्ष आणि पाच ते सहा लाख खर्च करून आठ ते बारा हजार नोकरीचे स्वप्न पाहण्यापेक्षा तो वेळ आणि तो पैसा स्वतःच्या कलागुण आणि कौशल्य विकासावर आणि स्वतःच्या उद्योगवर खर्च केला तर कमी वयात स्वतःच्या पायावर उभे राहता येईल आणि आपल्या कुटुंबाला आर्थिक स्थैर्य देखील देता येईल.
DTE Maharashtra Engineering Admissions 2020 : www.dtemaharashtra.gov.in
direct second year engineering admission 2020 | maharashtra polytechnic admission 2020
कॅप राऊंड ॲडमिशन च्या लिस्टमध्ये नाव जाहीर झाल्यानंतर कॉलेजेसना प्रत्यक्ष भेट देताना पुढील काळजी नक्कीच घ्यावी :
1. पूर्वतयारी आणि प्रत्यक्ष भेट :
सर्व पालकांनी स्वतः उपस्थित राहून आपल्या मुलासोबत कॉलेज ला प्रत्यक्ष भेट द्यावी. ते कॉलेज NAAC Acrrediated आहे का ते तपासून घ्यावे. प्रत्यक्षात जाण्यापुर्वी त्या कॉलेजची वेबसाईट ला भेट द्यावी.
महत्त्वाचे त्या वेबसाईट वर असलेले आपला पाल्याचे डिपार्टमेंट कॉलम नक्की तपासावा त्यावर असलेली माहिती जसे विविध प्रकारच्या लॅबोरेटरीज त्या डिपार्टमेंट मध्ये असलेले प्राध्यापक, त्यांचा अनुभव, त्यांचे शिक्षण त्याच्या व्यतिरिक्त तिथे उपलब्ध असलेली वेगवेगळ्या सोयीसुविधा उदाहरणार्थ मुलांच्या कलागुणांना वाव देणारे विविध कॉम्पिटिशन, वेगवेगळे सेमिनार, प्रोजेक्ट exhibitions, प्लेसमेंट इंटरंशिप यांची माहिती लेखी स्वरुपात किंवा मोबाइल स्क्रीन शॉट घेऊन ठेवाव्यात. कारण या माहितीची सत्यता पडताळणी प्रत्यक्ष भेटीत करता येऊ शकते.
2. प्रत्यक्ष पडताळणी :
प्रत्येक पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी या प्रत्यक्ष भेटी दरम्यान सजग आणि सतर्क रहावे. कॉलेजेस आणि तेथील कर्मचाऱ्यांनी दिलेली माहिती यावर आंधळेपणाने विश्वास ठेवू नये कारण असे पाहण्यात येते आहे की ऍडमिशन वाढवण्याकरिता कित्येक कॉलेजेस खोटी माहिती देऊन प्रचार करून मुलांना आणि त्यांच्या पालकांना आकर्षित करून ऍडमिशन मिळवतात जसे की एडमिन ऑफिसमध्ये किंवा मेन गेटवर किंवा entrance वर गुगल वरून डाऊनलोड केलेले लोगो वापरून कॉलेजची गेल्यावर्षीची प्लेसमेंट दाखवण्याची धडपड केली जाते.
प्रत्यक्षात ही प्लेसमेंट मुलं स्व मेहनतीने स्वतःच्या गुणवत्तेने मिळवलेली असते परंतु कित्येक कॉलेजेस ही माहिती त्यांच्याकडून मिळवून त्यांची प्लेसमेंट आम्हीच केली असा खोटा दावा करतानाही त्यांना बिलकुल शरम येत नाही. सर्व पालकांनी अशा भेटीदरम्यान ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर कडे झालेल्या प्लेसमेंट/विद्यार्थ्यांचे मोबाईल नंबर लिस्ट मागून घ्यावी आणि घरी आल्यावर कमीत कमी पाच ते दहा विद्यार्थ्यांना कॉल करून खातरजमा करून घ्यावी. कारण खरी माहिती हे त्या कॉलेजचे माजी विद्यार्थी देऊ शकतील तिथे येणाऱ्या प्लेसमेंट आणि इंटरंशिप बद्दल अधिक माहिती सुद्धा तेच विद्यार्थी देऊ शकतील म्हणून ठराविक मोबाईल नंबर न घेताच संपूर्ण लिस्ट ची मागणी करण्यात यावी अन्यथा फसगत निश्चित होईल.
3. खोट्या प्रचाराचे आकर्षक दावे :
कित्येक कॉलेजेस International Students Exchange Program/Foreign placement / Free
language courses/Free WIFI, विदेशात प्रोजेक्टस किंवा तिथे प्रत्यक्ष भेट/नोकरी देण्याचा दावा करतात. कृपया अशा दाव्यांची पडताळणी करण्यात यावी अन्यथा फसगत आणि आर्थिक भुर्दंड होण्याची दाट शक्यता असते अशा माहितीची पडताळणी तुम्ही तिथे असलेल्या विद्यार्थ्यांसोबत बोलून करू शकता पण लक्षात ठेवा ही माहिती घेताना कर्मचार्यांना पासून दूर राहा. नाहीतर सर्व प्री प्लॅन असू शकते.
4. डिपार्टमेंट आणि लॅबस ना प्रत्यक्ष भेट :
या भेटीदरम्यान ज्या डिपार्टमेंटला प्रवेश घ्यायचा निश्चित आहे त्या डिपार्टमेंटला नक्कीच आवर्जून भेट द्यावी आणि आदल्या रात्री घेतलेल्या माहितीची पडताळणी करावी जसे वेबसाईटवर असलेले स्टाफ तिथे प्रत्यक्षात आहे का त्यांनी केलेल्या दाव्यानुसार तिथे लॅबस आहेत का?
लॅब मध्ये सर्व मशिनरीज चालू आहेत का हे पडताळण्यासाठी तिथे उपस्थित असलेला स्टाफ यांना कोणतेही एक प्रॅक्टिकल परफॉर्म करण्याची विनंती करण्यात यावी असे पाहण्यात येते आहे की पालक वर्ग हा प्रॅक्टिकल्स संदर्भात अज्ञानी असल्यामुळे फक्त मशिनरीज वरती कव्हर घालून सांगण्यात येते की आमच्याकडे 100% प्रॅक्टिकल होते परंतु प्रत्यक्ष एक दोन प्रॅक्टिकल मशिनरीज चालू कंडीशन मध्ये असतात म्हणून पालकांनी कुठलेही एक प्रॅक्टीकल प्रत्येक लॅबमध्ये जाऊन परफॉर्म करून बघून घ्यावे.
5. कॅन्टीन Visit :
या भेटीदरम्यान कॉलेज कॅन्टीन नक्की आवर्जून पहावे तेथे असलेल्या वस्तूची गुणवत्ता पाण्याची चव ही नेहमीच सारखे असते का की फक्त ऍडमिशन दरम्यान गुणवत्ता राखली जाते ही माहिती कॅन्टीनमध्ये उपस्थित असलेल्या मुलांकडून मिळू शकते.
6. मीटिंग विथ HOD :
या भेटीदरम्यान तुम्ही त्या डिपार्टमेंटला उपस्थित असलेल्या हेड ऑफ डिपार्टमेंट HOD भेट देऊन अधिक माहिती गोळा करू शकता किंवा पडताळू शकता आणि तुमची ओळख देखील करून घेऊ शकता. अभ्यासाव्यतिरिक्त इंजीनियर्स लागणारे कलाकौशल्य विकासाकरिता कोणते प्रोग्राम आयोजित केले जातात त्याची माहिती, फोटोज तुम्ही नक्की मागू शकता.
7. हॉस्टेल फॅसिलिटी :
जर होस्टेल ला राहण्याची तयारी असेल तर होस्टेल ला रुमची व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, गरम पाण्याची व्यवस्था आणि उपलब्ध असलेल्या मेस ची गुणवत्ता हॉस्टेल मध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांकडून खात्री करून घेण्यात यावी अन्यथा ऍडमिशन च्या वेळेला दाखवण्यात येणारी व्यवस्था आणि प्रत्यक्षातील व्यवस्था यात फरक असू शकतो.
8. ट्रांसपोर्टेशन फॅसिलिटी :
जर कॉलेज स्टेशन पासून दूर असेल आणि कॉलेजची स्वतःची बस व्यवस्था असेल तर बस व्यवस्था आणि बस व्यतिरिक्त तिथे पोहोचण्याचे इतर पर्याय जसे की रिक्षा, मेटाडोर यांना लागणारा खर्च पाहता कोणते सोयीस्कर आहे हे तिथे असणाऱ्या विद्यार्थ्यांकडून कन्फर्म करू शकता आणि लक्षात घ्या कोणतेही कॉलेज अवास्तव बस फीस आकारु शकत नाही आणि जर कंपल्सरी म्हणत असेल तर फीज स्ट्रक्चर वर त्याची नोंद कंपल्सरी म्हणून करून घ्यावी.
9. लायब्ररीला भेट :
कॉलेज भेटीदरम्यान लायब्ररी ला नक्की भेट द्यावी सध्याचे युग ई लर्निंग चे आहे अशा परिस्थितीमध्ये तिथे फ्री E-BOOKS अवेलेबल आहेत का? वेबसाईट वरती ही फॅसिलिटी अवेलेबल आहे का? प्रत्यक्ष रेफरन्स बुक्स तिथे अवेलेबल आहेत का? हे नक्की पडताळून घ्यावे.
10. ऑनलाइन एज्युकेशन सोबत अतिरिक्त सुविधा :
कोरोणा मुळे सर्वच कॉलेजेस ऑनलाइन एज्युकेशन वर भर देत आहेत परंतु हे विद्यार्थ्यांसाठी आणि शिक्षकांसाठी नवीन माध्यम असल्यामुळे अडचण येऊ शकते अशावेळी तिथे लाईव्ह लेक्चर पेक्षा दुसरे पर्याय उपलब्ध आहेत का हे विचारून घ्यावे कारण प्रत्येक घरी वाय-फाय नसतो आणि मोबाइल डेटा ही पुरेसा नसतो. काहीवेळा नेटवर्क हि नसते. अशावेळी आपल्या मुलांचे ऑनलाइन एज्युकेशनच्या भानगडी मध्ये नुकसान होऊ शकते.
11. EBC, स्कॉलरशिप आणि फीस :
EBC, स्कॉलरशिप ची सवलत घेताना आधीच्या विद्यार्थ्यांच्या किती स्कॉलरशिप प्रलंबित आहेत हेदेखील एडमिन स्टाफ कडून जाणून घ्यावे आणि त्याची पडताळणी करून घ्यावी. चालू तसेच येणाऱ्या या दोन ते तीन वर्षांचे फीस स्ट्रक्चर नक्की मागून घ्यावे याचा उपयोग विविध शासकीय काम बँकेच्या कामासाठी देखील होऊ शकतो.
dte maharashtra 2020 | diploma admission 2020 maharashtra
लक्षात घ्या… सर्वच कॉलेजेस हे कागदोपत्री उत्तमच असतात परंतु वास्तवात स्थिती भयानक असते. हे पुढे दोन-तीन वर्षानंतर समजून येते तोपर्यंत आपल्या मुलाचे भवितव्य, त्यांचा आत्मविश्वास आणि आपल्या आयुष्याची जमापुंजी मात्र खर्ची पडलेली असते.
🙏🏻 सर्व पालकांना आणि विद्यार्थ्यांना एक विनंती आहे की अत्यंत शांतपणे, डोळसपणे, जाणकार होऊन माहिती घ्यावी आणि वरील मुद्दे जर तुम्हाला पटले आणि त्यामध्ये कमीतकमी 60 टक्के समाधानकारक उत्तरे मिळाली तरच प्रवेश निश्चित करावा. कोणतेही कॉलेज 100% परफेक्ट असू शकत नाही हे मान्य आहे परंतु कमीत कमी साठ टक्के तरी प्रामाणिक असावे हाच मूळ उद्देश या लेखाचा.
तेथील काम करणारा कर्मचारी आपल्या गावाकडचा आहे, नातेवाईक आहे म्हणून कोणाच्याही बोलण्यात येऊ नये. कॉलेजच्या असलेल्या अवाढव्य कॅम्पसच्या मोहात देखील पडू नये. चुकूनही आपले ओरिजनल डॉक्युमेंट्स इमोशनल होऊन पहिल्याच दिवशी कॉलेजला देऊ नये. सर्व माहितीची खातरजमा झाली नंतरच प्रवेश निश्चित करताना स्वतःकडे एक हार्ड झेरॉक्स कॉपी आणि एक सॉफ्ट कॉपी Google drive वर Save ठेवून ओरिजनल डॉक्युमेंट देऊ शकता.
😇🙏🏻सावध रहा सतर्क रहा आणि नफेखोर कॉलेजेस पासून दूरच राहा. जागो विद्यार्थी जागो 🙏🏻😇
documents required for engineering admission in Maharashtra
लेख : डिजिटल एकलव्य इंजीनियरिंग
लेख आवडल्यास सर्वांना शेअर करा …
आमच्या पोस्टच्या अपडेट मिळवण्यासाठी फॉलो करा : Facebook | Instagram | Twitter | Telegram
Khup Chan Mahiti
Thanks for info looking very useful